नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.भाजपला बहुमत नसल्याने यंदा एनडीए सरकारमध्ये घटकपक्षांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती.अनेक संभाव्य नावं चर्चेत देखील होती.पण त्या नावांपैकी एकूण 6 नेत्यांना संधी मिळाली आहे.नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना पुन्हा एकदा कॅबिनेट, तर रामदास आठवलेंना पुन्हा एकदा राज्यमंत्रिपद देण्यात आलंय. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री करण्यात आलंय. तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही राज्यमंत्रिपद देण्यात आलंय.या नेत्यांची राजकीय पार्श्वभूमी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
भाजपचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा खासदारकी पाठोपाठ केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक केलीय.2014,2019 आणि 2024 अशा सलग तीन वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले.. 2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते.रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील पाच वर्षात त्यांनी देशाचे वाहतूक मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.गडकरी यांना देशातील दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून देखील ओळखलं जातं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील 55 उड्डाणपूल विक्रमी वेळेत निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.मोदी यांच्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांना देखील तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची संधी मिळाली आहे…2014 आणि 2019 या दोन्ही मंत्रिमंडळात पियुष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही गोयल यांना कॅबिनेटमंत्रिपद मिळालं आहे.पियुष गोयल यांनी व्यापार आणि वाणिज्य, तसेच ऊर्जामंत्री अशी विविध खाती देखील यशस्वीपणे हाताळली आहेत. लोकसभेतील त्यांचं महत्व पाहून सर्वात सुरक्षित अशा मुंबई -उत्तर लोकसभा मतदार संघातून गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती.. या मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने भुषण पाटील यांना उभा केले होते. पण पियूष गोयल मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आता त्यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली आहे..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.विशेष बाब म्हणजे आठवले यांच्याकडे एकही खासदार नाही. अशा स्थितीतही त्यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली आहे…पहिल्या दोन टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली होती.यावेळी देखील त्यांना तेच पद कायम ठेवण्यात आलं आहे..आठवले यांनी देखील केंद्रीय मंत्रिमंडळात एकाच पदी राहण्याची हॅट्रिक साधली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे.
प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला आहे. खरं तर मंत्रीपदासाठी त्यांच्याशिवाय अनेक नावे स्पर्धेत होती. मात्र ज्येष्ठता, सलग चारवेळा विजय, राज्यात मंत्री पदाचा अनुभव, मागील कार्यकाळात केंद्रीय ग्रामविकास समिती आणि माहिती तंत्रज्ञान या दोन समित्यांच्या अध्यक्षपदाची संभाळलेली धुरा, दिल्लीतील राजकारणाचा अभ्यास, वरिष्ठ भाजपा नेत्यांशी असलेले संबंध आदी घटकामुळे त्यांचं पारडं जड ठरलं. शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदेंना दिलेलं पाठबळ, खासदारांची केलेली जुळवाजुळव ,यंदाच्या लोकसभा लढतीत ठाकरेसेनेच्या उमेदवाराचा केलेला पराभव हे घटक देखील पूरक ठरल्याचं मानलं जात आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री पदासाठी खासदार जाधव यांच्या नावाची शिफारस केली.जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे..नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून त्या एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत.त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.यानंतर त्या काही काळ जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा 16 व्या लोकसभेत वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होत्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षानं पुन्हा विश्वास ठेवत त्यांना संसदेत पाठवलं.आता 2024 च्या निवडणुकीतही त्या निवडून आल्या.रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा नेहमीच मोठा वाटा राहिलाय.पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून विजय मिळवला.नवनिर्वाचित खासदार होताच त्यांना केंद्रीय राज्य मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे…नगरसेवक, महापौर ते आता केंद्रात मंत्रीपद अशी मोहोळ यांची कारकीर्द राहिली आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत..आणि आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं आहे. मोदींच्या मावळत्या मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला. आता ज्या सहा नेत्यांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे त्या पैकी नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ हे भाजपाचेच आहेत. मित्रपक्षांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक पद देण्यात आलं.. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला असला तरी या पक्षाचे राज्यसभा खासदारही आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने सध्यातरी अजित पवाराच्या पक्षाने इतर मंत्रिपद घेण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे.