नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मोदींसह ७१ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात ७ महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मंत्र्यांची संख्या घटली आहे. मोदींनी २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या मंत्रीमंडळात एकूण १० महिला नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. २०१९ मध्ये ही १० महिला मंत्री होत्या. पण आता हा आकडा कमी झाला आहे.यावेळी केवळ ७ महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.या सात महिला नेत्या कोण आहेत?त्यांच्याकडे कोणतं खातं सोपवण्यात आलं आहे..याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
यंदाची निवडणूक महिला केंद्रीत होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रही महिला केंद्रीत केली होती. तसंच, यंदा नोंदणीकृत महिला मतदारांची संख्याही पुरुषांच्या तुलनेत अधिक होती. तर मतदानामध्ये ही सर्वाधिक महिला मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे. पण, दुसरीकडे यंदा फक्त १० टक्केच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी फक्त ३० महिला खासदार म्हणजे जवळपास ५ टक्केच महिला खासदार निवडून आल्या आहेत. त्यापैकी फक्त सात महिलांना मंत्रीपद दिलं असून त्यातील २ कॅबिनेट मंत्री तर, उर्वरित पाच राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असलेल्या महिलांमध्ये निर्मला सीतारमण आणि अन्नपूर्णा देवी यांचा समावेश आहे.
निर्मला सीतारामन
२०१४ आणि २०१९ च्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेल्या मोजक्या महिलांपैकी एक निर्मला सीतारामन आहेत. २०१४ च्या मंत्रिमंडळात, त्यांनी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम केले होते. नंतर स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. २०१७ मध्ये त्यांची केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली. सीतारामन या भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या. २०१९ च्या कार्यकाळात, सीतारामन यांनी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला… ही जबाबदारी पूर्णवेळ सांभाळणार्या त्या पहिल्या महिला मंत्री ठरल्या. त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काही काळ अर्थखाते सांभाळले होते. आता पुन्हा एकदा सीतारामन यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार खाते सोपवण्यात आले आहे…
अन्नपूर्णा देवी
केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आलेल्या दुसऱ्या महिला नेत्या आहेत अन्नपूर्णा देवी.. झारखंडमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या आठ नेत्यांमध्ये अन्नपूर्णा देवी यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून यादव समुदायातील असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी कोडरमामध्ये सीपीआय लिबरेशनच्या विनोद कुमार सिंग यांचा ३,७७,०१४ मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला. १९९८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते राहिलेले त्यांचे पती रमेश यादव यांच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आरजेडीबरोबर केली. कोडरमा विधानसभेच त्यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. २०१२ मध्ये त्यांनी झारखंड सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या काळात त्या झारखंडच्या आरजेडीप्रमुख होत्या. पण २०१९ मध्येच त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपाच्या तिकिटावर लक्षणीय फरकाने कोडरमाची जागा जिंकली. तेव्हा त्यांना मोदी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती…राज्यमंत्री पदावरून त्यांना आता कॅबिनेट मंत्री पदावर बढती देण्यात आली आहे .त्यांच्याकडे महिला व बालकल्याण हे खातं सोपवण्यात आलं आहे..
अनुप्रिया पटेल
पटेल या एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल च्या अध्यक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होत्या. तर, दुसऱ्या टर्मवेळी त्यांनी वाणिज्य आणि उद्योग खात्याचं कनिष्ठ मंत्री पद सांभाळलं आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभा जागा जिंकली आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार रमेश चंद बिंद यांचा ३७ हजार पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे, या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाची जागा दोनवरून एकवर आली आहे. आता यावेळी त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण, खते आणि रसायन हे केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
शोभा करंदलाजे
पुढच्या महिला नेत्या आहेत शोभा करंदलाजे … त्यांनी दुसर्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकातील भाजपाच्या दोन वेळा खासदार असलेल्या शोभा करंदलाजे यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी बंगळुरू उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या राजीव गौडा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्या बंगळुरूमधील पहिल्या महिला खासदार ठरल्या. त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे. करंदलाजे या मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळात कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री होत्या. आता यावेळी त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार हे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रक्षा खडसे
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसेंना संधी देण्यात आली आहे. रावेरमधून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा २,७२,१८३ मतांनी पराभव केला. रक्षा खडसेंची प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदी वर्णी लागली आहे..त्यांच्याकडे क्रीडा आणि युवा कल्याण या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निमुबेन बांभनिया
बांभनिया यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे… भाजपाच्या तिकिटावर गुजरातमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तीन महिला उमेदवारांपैकी बांभनिया या एक आहेत. त्यांनी भावनगर लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या उमेश मकवाना यांच्या विरोधात 4,55,289 इतक्या मतांच्या उल्लेखनीय फरकाने विजय मिळवला.निमुबेन बांभनिया या भावनगरच्या माजी महापौर राहिल्या आहेत..त्यांनी २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांनी २०१३ ते २०२१ दरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या गुजरात युनिटच्या उपाध्यक्षा म्हणून काम केलं आहे…आता त्यांच्याकडे ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण हे खातं सोपवण्यात आलं आहे..
सावित्री ठाकूर
सावित्री ठाकूर यांनीदेखील मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशातील प्रमुख आदिवासी नेत्या असलेल्या ठाकूर यांनी धार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या राधेश्याम मुवेल यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. ठाकूर या दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांना ‘दीदी’ म्हणून ओळखले जाते. आदिवासी आणि गरीब महिलांच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक दशकाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना धार लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या या जागेवरून त्या विजयी झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत मात्र भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली.. पण आता थेट त्यांना राज्यमंत्री पदाची संधी देण्यात आली आहे…त्यांच्याकडे महिला व बालकल्याण या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.