लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यात काँग्रेस खिळखिळी झालेली असताना कुणालाही वाटलं नव्हतं पक्ष इतक्या जागा जिंकेल.काँग्रेसने राज्यात १३ जागांवर विजय मिळवला.सांगलीत बंडखोरी करून अपक्ष उभा राहिलेल्या विशाल पाटलांच्या रुपात एकप्रकारे काँग्रेसचाच विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं महत्त्व वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीची कामगिरी चांगली राहिली. परंतु, काही राज्यात काँग्रेसची कामगिरी खूपच खराब झाली. त्यामुळं काँग्रेसमध्ये आता लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. ज्यांची कामगिरी चांगली झाली नाही अशांना बदलण्याचा निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेणार आहे.त्यानुसार काँग्रेसचे अनेक प्रदेशाध्यक्ष, काही राज्यांचे प्रभारी बदलण्यात येणार आहेत. यात हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांना पदावरुन दूर केलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर तेलंगणात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या रेवंत रेड्डींना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळं केलं जाऊ शकतं. पण महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी सरस झालेली असतानाही प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा का होत आहेत.१३ खासदार निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या नाना पटोले यांचंही पद धोक्यात येऊ शकतं का? याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला होता. त्यानंतर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई सुरू झाली. अनेक नेत्यांनी साथ सोडली. महाराष्ट्रात देखील काँग्रेसला घरघर लागल्यानंतर बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. अशोक चव्हाण यांच्यासह मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि बाबा सिद्धिकी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. यानंतर कॉंग्रेसच्या अस्तित्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली. मात्र या निवडणुकीत सारचं चित्र पालटलंं.भाजपचं कुरघोडीचं राजकारण, शिवसेना-राष्ट्रवादी पक्षफुटी, मराठा आरक्षण मुद्दा अशा अनेक मुद्द्यांमुळे निकालाला कलाटणी मिळाली. दुसरीकडे या निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील वादाचा फायदा हा मोठ्या प्रमाणात काँग्रेसला झाला..या सर्व घडामोडीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं..लोकांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला…महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली झाली. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी आपापली कामगिरी चोख बजावल्यानं पक्षाला दणदणीत यश मिळालं.
नाना पटोले यांच्या आक्रमक नेतृत्वाला काँग्रेसमधील अनेक जुन्या नेत्यांचा विरोध दिसून आला आहे. प्रदेशाध्यक्ष बदला म्हणून त्यांच्या मार्फत अनेकदा मोहिमदेखील राबविली गेली. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानं ही मोहिम थोडीशी थंडावली. परंतु, प्रदेशाध्यक्ष हा भावी मुख्यमंत्री असतो. त्यामुळे चार महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण बनणार. या विचारानं काँग्रेसमधील हे जुने जाणते नेते महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी धडपड करू लागलेत अशी राज्याच्या राजधानीत मुंबईमध्ये चर्चा आहे. खरंच नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं तर, या पदावर कोणाची निवड करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तर त्यासाठी अमरावतीमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यशोमती ठाकूर, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणणारे सतेज पाटील यांचीही नावं प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे नाना पटोलेंचे उद्धव ठाकरेंसोबत खटके उडत असताना यशोमती ठाकूर, सतेज पाटील हे दोन्ही नेते काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यांनी दिल्लीत जाऊन गांधी कुटुंबाची भेटही घेतली होती.नाना पटोले यांची कामगिरी चांगली राहिली असली तरी त्यांना अनेकदा पक्षातून विरोध झाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाणार अशा चर्चा सुरु होत्या. पण त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करून या दोन्ही नेत्यांशी संवाद साधला आणि या दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आले.त्यानंतर पुन्हा पटोलेंना हटवण्याची मागणी जोर धरू लागली.काँग्रेस नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. नाना पटोले यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली. नाना पटोले यांची पक्षात मनमानी सुरू आहे. असे आरोप पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर करण्यात आले होते. पुढे हा वाद शमवण्यात आला…असं असलं तरी या लोकसभा निवडणुकीत सर्वजण एकजुटीने सामोरे गेले आहेत.त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून नाना पटोले यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा विचार केला जाईल असं सध्या तरी वाटत नाही.