एकेकाळच्या कट्टर शरद पवार समर्थक, राष्ट्रवादीच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या सूर्यकांता पाटील या गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत होत्या.पण गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपात नाराज असल्याची चर्चा होती. आणि आता सूर्यकांता पाटील यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांनी 2014 साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता १० वर्षानंतर त्या पुन्हा स्वगृही परतल्या आहेत…याच निमित्त आमदार, चार वेळा खासदार त्यानंतर मंत्री अशी मोठमोठी पदं संभाळणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा आतापर्यंतचा राजकारणातला प्रवास नेमका कसा राहिलाय ? त्या पुन्हा स्वगृही का परतल्या आहेत ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत होत्या. त्यांची नांदेड जिल्ह्यात डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. मागील 10 वर्षांपासून त्या भाजपामध्ये काम करत होत्या. पण १० वर्षात कुठलंही महत्वाचं पद न मिळाल्यामुळे पाटील भाजपात नाराज होत्या.१० वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं, मी पक्षाची आभारी आहे असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे… भाजपात नाराज असल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जातं.सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. हिंगोलीतून लोकसभेच्या तिकीटासाठी त्या आग्रही होत्या. पण ती जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली होती. सूर्यकांता पाटील या चार वेळा खासदार, एक वेळा आमदार होत्या.