भेटी लागे जीवा… लागलीसे आस… अभंगातील या ओळींप्रमाणं खरोखरंच वैष्णवांच्या या मेळ्याला वारकऱ्यांना आपल्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते.आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात.यावर्षीही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीतून तर संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूतून प्रस्थान करणार आहे.या दोन्ही पालख्यांचे मार्ग कसे असणार आहेत? त्या कुठे मुक्कामी असणार आहेत? याचं संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओत पाहुयात…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दिनांक २८ जून २०२४ रोजी देहूतील इनामदार साहेब वाडा येथून होईल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी आळंदीतून होईल. माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत, गांधी वाडा येथे असेल.संत तुकाराम महाराजांची पालखी २९ तारखेला चिंचोली-निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल. इथं पालखीचा पहिला मुक्काम असेल. रविवार दिनांक ३० जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. धाकल्या व थोरल्या पादुका मंदिर, दिघी, संगमवाडी मार्गे पालखीचं पुण्यात आगमन होईल. पुण्यातील भवानी पेठेत माउलींच्या पालखीचा दुसरा मुक्काम असेल. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा पिंपरी-कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात असेल.सोमवार दिनांक १ जुलै रोजी श्रींच्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच असणार आहे.