केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार महिनाभरात म्हणजे येत्या ऑगस्ट मध्ये कोसळणार असा खळबळजक्ष लालू प्रसाद यादव यांनी केलाय. लालू प्रसाद यादव यांच्या या दाव्यात किती दम आहे? कशावरून त्यांनी हा दावा केला? पूर्ण बहुमत असलेलं एनडीए सरकार कशामुळं पडेल? असे अनेक प्रश्न लालू प्रसाद यांच्या दाव्यानंतर उपस्थित होत आहेत. खरंच एनडीए सरकार पडू शकतं का? या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहोत…
राष्ट्रीय जनता दलाला २८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील एनडीए सरकार येत्या महिन्याभरात म्हणजे ऑगस्ट मध्ये कोसळणार असा खळबळजनक दावा केला. आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. २०२४ च्या निवडणुकीचा निकाल हाती आला आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असलेलं परंतु, काटावर पास झालेलं सरकार केंद्रात सत्तेत आलं. संयुक्त जनता दलाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेलगु देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडु यांच्या पाठिंब्यावर केंद्रातील एनडीए सरकार अस्तित्वात आले आहे. ज्यावेळी हे दोघे पाठिंबा काढायचं ठरवतील त्यावेळी सरकार अल्पमतात येईल. ही वस्तुस्थिती असली तरी, दोन्ही नेते एकाचवेळी पाठिंबा काढण्याचा निर्णय का घेतील? असा विचारही केला पाहिजे. लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी केली असली तरी त्यामध्ये किती तथ्य आहे? किंवा खरंच तसा भूकंप होईल का यासंदर्भात पडताळणी केली पाहिजे.