लोकसभेनंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत… लोकसभेमध्ये महायुतीच्या पदरात अपयश पडलं. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पारड्यात अपयश पडू नये यासाठी महायुती आपल्या बाजूनं सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसून येतेय… परंतु, महायुतीला धक्का बसेल अशी बातमी सध्या चर्चेत आहे आणि ती म्हणजे प्रहार संघटनेचे प्रमुख अचलपूर विधानसभेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत… बच्चू कडू आणि महायुतीमध्ये नाराजीचं नेमकं कारण काय…? आतापर्यंत महायुतीसोबत असलेले बच्चु कडू का त्यांना सोडतायत…? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख व अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचं नाव महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या आंदोलनांची स्टाईल असो किंवा सरकारी अधिकाऱ्याला केलेली मारहाण असो बच्चू कडू या ना त्या कारणाने सतत चर्तेत असतात. यातच आता बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडू असं वक्तव्य केलंय. आता देखील बच्चु कडू चर्चे आहेत ते त्यांच्या वक्तव्यामुळं. ते म्हणाले की, मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आम्ही १५ ते १७ जागा या विधानसभेमध्ये लढवू आणि त्या जिंकू देखील असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत जे मार्गी अद्यापही लागलेले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आम्ही रविकांत तुपकर यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीचा आम्ही विचार करीत आहोत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घ्यावा लागेल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.
बच्चू कडू यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्याबदल्यात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास अशा वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं. पण जेव्हा उद्धव ठाकरेंचं आसन डळमळीत होतंय हे लक्षात आलं तेव्हा ते एका क्षणात शिंदे गटात सामील झाले. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या प्रहार संघटनेचे एकूण २ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी बच्चू कडूंनी केल्याचं समोर आलं होतं. परंतु बच्चू कडू यांना मंत्रिपदाच्या दर्जाच पद देण्यात आलं. लोकसभेला बच्चू कडू आणि महायुतीमध्ये नाराजी दिसली. अमरावतीत लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार रिंगणात आणला. बच्चू कडू यांनी भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नाही. नवनीत राणा यांना पराभूत करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात आला यावेळी देखील बच्चू कडू यांनी सरकारवर जाहीर टीका केली. या अर्थसंकल्पात शेकऱ्यांसाठी ज्या योजना मांडण्यात आल्या त्यावर बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पाच एकरची अट ठेवण्यात आलीय. मात्र आजही विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. पाच एकर शेती असतानाही त्यांच्या शेतीला पाणी मिळत नसल्यानं त्यातून काहीही उत्पन्न निघत नाही. त्यामुळे पाच एकरची जी अट ठेवली आहे, ती रद्द करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तिसरी आघाडी होते का? आणि या आघाडीत आणखी कोण-कोणते पक्ष सामील होतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.