महाराष्ट्राच्या राजकारणातली गेली पाच वर्षे ही अनेक रहस्यमय राजकीय घडामोडींनी भरलेली आहेत. त्यातल्या गेल्या अडीच वर्षात तर, अनेक धक्कादायक घटना घडताना आपण सर्वांनी पाहिल्या.यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासारखे दोन मोठे पक्ष फुटले.राज्यात स्थिर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं अन् महायुतीनं नवीन राजकीय गणितं जुळवून आणली.राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटणं आणि त्यातून तयार झालेलं नवं सरकार हे कायद्याच्या कसोटीत कितपत योग्य आहे.यावर अनेकदा चर्चा झाल्या.मात्र, आता हे दोन्ही विषय निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. यासह राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्षाबाबात दिलेल्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.याबाबतच्या चारही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एक आठवड्याच्या कालावधीत सुनावणी पार पडणार आहे.त्यामुळं या एका आठवड्यात होणाऱ्या 4 सुनावण्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. नेमकं काय होऊ शकतं? महायुतीला याचा फटका बसू शकतो का? की महाविकास आघाडीलाच फटका बसणार? याच संदर्भात आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत…
सगळ्यात आधी पाहुयात सर्वोच्च न्यायालयात कोणत्या दिवशी कोणत्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर 8 जुलैपासून न्यायालयाचं कामकाज पुर्ववत झालंय.अशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील चार महत्त्वपूर्ण याचिकांचा फैसला होणार आहे.यातील पहिली सुनावणी पार पडेल ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकेवर.सर्वोच्च न्यायालयात 12 जुलै रोजी यावर सुनावणी पार पडेल.यानंतर 15 जुलैला शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर.16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि नावाबाबतच्या याचिकेवर तर, 19 जुलैला राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.या सर्व याचिकांचा निर्णय जो काही असेल तो निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम करणार असेल.त्यामुळेच सध्या एकाच आठवड्यात होणाऱ्या या चारही सुनावण्यांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.