विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. भाजपा १७० ते १८० जागा लढवणार असल्याचं बोललं जातंय. भाजपाकडून प्रत्येक मतदार संघाचा सर्वे केला जातोय. परंतु नागपूर शहरातील उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाला मात्र सर्व्हेतून वगळण्यात आले आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेसोबत असलेले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी विचारणा झाली असल्याचे समोर आले आहे.
लोकसभेला नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत झाली पण नितीन गडकरी यांना सर्वच मतदारसंघातून मागील निवडणुकीपेक्षाही कमी मतदान झाले असले तरी देखील नितीन गडकरी यांनी १,३७,६०३ मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा पराभव केला. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विकास ठाकरेंना सर्वाधिक मते मिळाली होती. त्यामुळे नागपूर मधील परिस्थिती बघता भाजपानं उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती असताना देखील भाजपानं उत्तर नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडली होती. आजवर शिवसेनेला एकदाही हा मतदारसंघ जिंकता आला नाही. दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचा आमदार भाजपाचा असल्याने भाजपाला दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरील आपला दावा सोडता येणार नसल्यामुळे उत्तर नागपूर विधसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे पीपल्स रिपब्लकीन पार्टीचे संस्थापक व अध्यक्ष लॉंग मार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात कवाडे यांनी केलेल्या संघर्षाचा फार मोठा वाटा आहे. आंबेडकरी समाजात कवाडे यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे जयदीप कवाडे यांचे नाव उत्तर नागपूरचे उमेदवार म्हणून समोर करण्यात आले आहे.