लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जसा फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी भाजप अॅक्शन मोड वर आलीय. विधानसभेला भाजप कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावरून स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं पदाधिकाऱ्यांचं पुण्यात अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यासाठी अमित शाह प्रमुख मार्गदर्शन म्हणून आले होते. मुक्कामादरम्यान शाह यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाचा आढावा घेतला. ज्या आमदारांची कामगिरी निष्क्रिय राहिली आहे अशा आमदारांचा पत्ता कट करून त्यांना नो चान्स म्हणत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला टाळण्यासाठी भाजपने नेमकी काय रणनीती आखली आहे.. हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं.त्यामुळे लोकसभेतील पक्षाची सुमार कामगिरी लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असले तरी जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यात कार्यकर्त्यांमधील नैराश्य दूर होऊन उत्साह निर्माण करण्याचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुण्यात झालेल्या अधिवेशनात प्रयत्न केला.यावेळी अमित शाहांनी राज्यातल्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाची झाडाझडती घेतली.लोकसभा निवडणुकीत काही जागांचे उमेदवार बदलले असते तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या…हे भाजपच्या लक्षात आलं.भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना, मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती.या चार पैकी मुंबई उत्तर पूर्व आणि बीडची जागा सोडली तर उर्वरित दोन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.आणि त्यामुळे आणखी जागांवरचे उमेदवार बदलले असते तर विजयी खासदारांच्या संख्येत वाढ झाली असती.ही भावना आता भाजपचे नेते आणि पदाधिकऱ्यांच्या मनात आहे… त्यामुळं लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील सुमार कामगिरी करणाऱ्या जनसंपर्क न ठेवणाऱ्या आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.२० जुलै रोजी अमित शाह पुण्यात मुक्कामी होते.अधिवेशनाच्या ठिकाणी येण्यापूर्वीही त्यांनी प्रदेश सरचिटणीसांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.यावेळी प्रदेश कोअर कमिटीचीही बैठक घेण्यात आली होती. राज्यातलं वातावरण भाजपसाठी फारसं पोषक नाही कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात आहेत.अशी माहिती अमित शाहांना देण्यात आल्याची माहिती समोर आली.त्याचा उल्लेख अमित शाहांनी आपल्या भाषणात केल्याचं पाहायला मिळालं.