पुणेः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज नवनियुक्त एनडीए सरकारचा पहिला २०२४-२५ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या अर्थसंकल्पात विविध आर्थिक योजनांची घोषणा करण्यात आली. या अर्थ संकल्पाचे लाईव्ह स्क्रीनिंग जीतो पुणे चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजय दांडेकर उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जीतो ॲपेक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, तसेच सीए सेलचे संचालक प्रभारी सीए सुहास बोरा, जीतो सीए सेलचे संयोजक मंगेश कटारिया, उद्योगक प्रकाश पारेख, राजेंद्र बोरा, राहुल दर्डा, सुजय शहा, इंदर जैन, इंदर छाजेड, रायकुमार नहार, मनोज छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया , संजय डागा , दिनेश ओसवाल , किशोर ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांनी अनेक घोषणा केल्या. गरीब महिला आणि शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, हिंदू, जैन आणि बौद्ध धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी तरतूद करण्यात आली. त्यासाठी घोषणा करण्यात आली. तसेच, 20 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून सरकारकडून उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर केली. सरकारकडून शेतीपूरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली तसेच यामध्ये काय महागणार आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार हे देखील सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल. या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विविध मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली. डॉ. अजय दांडेकर यांनी ‘हे बजेट आजच्या आर्थिक परिस्थिती नुसार केलेले बजेट असून, सर्व सामन्यांच्या काही अपेक्षा पूर्ण होतात तर, काही होत नाहीत. यामध्ये इन्व्हेस्टमेंट जनरेट करण्याचा प्रश्न होता त्यासाठी आणखीन बरेच बदल करण्याची आवश्यकता होती, असं मत व्यक्त केलं. जीतो अपेक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल म्हणाले की, यावेळी केंद्र सरकारने युवकांसाठी काही योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे. TDS बाबत जी कारवाई आधी केली जात होती त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून हा एक मोठा आणि चांगला निर्णय आहे.
जीतो ॲपेक्सचे माजी उपाध्यक्ष विजय भंडारी हे अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले की, हे बजेट 30 ते 70 टक्क्याचे बजेट असून, या बजेटमध्ये जैन युनिव्हर्सिटीसाठी चांगली डेव्हलपमेंट केली आहे. परंतु, इंडस्ट्रीमध्ये एक्स्पोर्ट साठीच्या लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु, त्या पूर्ण झाल्या नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हे बजेट तरुणाईसाठीचे असून, त्यांच्या करता नोकरी, शेती, व्यवसाय, शिक्षण, ज्याची देशाला गरज आहे. जिथ महागाई वाढली आहे. अशा मुद्यांवर लक्ष केले असून, युवकांच्या नोकरीसाठी नवीन कंपन्या उभारण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हा अर्थ संकल्प गरिबांकडे, युवकांकडे आणि शेतकऱ्यांकडे पूर्णपणे लक्ष देणारा आहे असे जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला म्हणाले.
सीए सेलचे संचालक प्रभारी सी.ए. सुहास बोरा यांनी सांगितले की, इनकम टॅक्स कायदा आणि कस्टम कायदा यावर सहा महिन्यातच बदल होणार असून हा एक चांगला संकेत आहे.
जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी म्हणाले की, केंद्र सरकारच्या बजेट मध्ये मेक इन इंडिया, एमएससीबी याच्या माध्यमातून बऱ्याच युवकांना नोकरीच्या संधी मिळतील. एक्सपोर्टसाठी मात्र खास सवलती दिल्या नाहीत.