नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विजयाची शंभर टक्के गॅरंटी अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती. परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात असलेलं वातावरण आणि अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून भाजपाच्या सोबत जाण्याच्या निर्णयामुळे असलेल्या नाराजीचा फटका प्रताप पाटील चिखलीकर यांना बसल्याच पाहायला मिळालं. लोकसभेतील पराभवामुळे अशोक चव्हाण अलर्ट होऊन अॅक्शन मोडवर आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची नात आणि माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया राजकारणातील एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचं दिसून येतंय. अशोक चव्हाण आणि आई अमिता चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर मतदारसंघातून श्रीजया राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिवंगत काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त १४ जुलै रोजी झालेल्या विविध कार्यक्रमात भोकर विधानसभा मतदारसंघात चव्हाण कुटुंब आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागल्याचे चित्र दिसून आलं. भोकर विधानसभा मतदारसंघात शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रीजया चव्हाण या कामाला लागल्या आहेत. मी शंकरराव चव्हाण यांची नात आहे, मला साथ द्या, अशी साद त्यांनी भोकर मतदारसंघातील मतदारांना घातली आहे.त्यामुळे जयंती निमित्तच्या कार्यक्रमांमधून श्रीजया चव्हाण ह्या राजकारणात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आता आपल्या कन्येच्या राजकीय प्रवेशाला ब्रेक लागू नये, यासाठी अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाची सुत्रे हाती घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीजया चव्हाण यांना जनतेशी संपर्क वाढवा असे सांगून भोकरमध्ये विजयाची समीकरणे जुळवून आणण्यासाठी अशोक चव्हाण झटताना दिसत आहेत.भोकर मतदारसंघात फिरताना आमच्यावर नानांचे संस्कार आहेत, त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती, मी पण कायद्याची पदवी घेतली आहे. नानांकडूनच मी समाजसेवेचा वसा घेतला आहे. मी शंकरराव चव्हाण यांची नात असून खासदार अशोक चव्हाण व माजी आमदार अमिता चव्हाण यांची मुलगी आहे, तुम्ही मला साथ द्या अशी भावनिक साद श्रीजया चव्हाण भोकर मतदार संघातील जनतेला घालत आहेत.पण, आता भोकरचे मतदार घराणेशाहीची परंपरा पुढे चालवणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार? हे आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.