महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचा येत्या 28 जुलै रोजी शपथविधी पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.
या विजयी आमदारांमध्ये भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे , सदाभाऊ खोत, शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.