बाबाजानी दुर्राणी यांनी आज अजित पवारांच्या नेतृत्वातीव राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी थेटपणे अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना टोला लगावला. “शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो”, असं म्हणत बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना टोला लगावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दुर्राणी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पभात प्रवेश केला. यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपेही उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर बोलताना बाबाजानी दुर्राणी म्हणाले, 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश करून घेत शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आगामी काळात राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्याकडे प्रवेश करतील असं विधान सातत्यानं शरद पवारांसोबत असणारे नेते करतायेत. त्यामुळे आगामी काळात अजून कोण अजित पवारांची साथ सोडणार का हे पहावं लागणार आहे.