विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अनेक राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले होते त्यानंतर अनेक राजकीय नेते अजित दादांसोबत गेले. पण आता तेच अजित दादांसोबत गेलेले नेते व आमदार हे घरवापसी करत आहेत. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसतोय. परभणीतल्या पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी हे अजित दादांची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
बाबाजानी २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं. बाबाजानी दुर्राणी यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपल्यामुळे त्यांनी पुन्हा विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पणअजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याच आशेवर पुन्हा परतण्याचा निर्णय बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.बाबाजानी दुर्राणी यांनी स्वतः याविषयीची माहिती दिलीये. ते म्हणाले, “२७ जुलैला दुपारी २ वाजता संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होईल. मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण राज्यात माझ्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सबंध देशात मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या पक्षांना मुस्लीम मतदार मतदान करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षासोबत राहणं आणि काम करणं अवघड होतं. त्यामुळे मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.”