स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील मतभेद हे आता अगदी टोकाला गेले आहेत…तुपकर यांनी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ निभावली पण आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे स्वाभिमानीमध्ये आणखी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर दोघांचाही पराभव झाला. पराभवातून काही शिकण्याऐवजी तुपकर आणि शेट्टी यांनी एकमेकांशी संघर्ष वाढवून घेतला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. पण तुपकर – शेट्टी संघर्ष का पेटला ? मतभेद टोकाला जाऊन का पोहोचले? याची कारणं काय ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यासोबत चळवळीत काम केल्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांचाही समावेश होता. शेट्टी यांच्यासोबत असताना सदाभाऊ खोत मंत्री झाले. परंतु मतभेद झाल्यानंतर खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकला. भाजपशी हातमिळवणी करून पुढे रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.याच काळामध्ये रविकांत तुपकर यांची व सदाभाऊ खोत यांची मैत्री वाढली. रयत क्रांतीच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी मिळेल असं तुपकर यांना वाटत असल्याने ते स्वाभिमानीपासून बाजूला गेले होते. उमेदवारीची अपेक्षा फोल ठरल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा शेट्टी यांची भेट घेऊन कोल्हापुरात घरवापसी केली होती. त्यानंतर पुढील ३ वर्ष शेट्टी – तुपकर यांचं ऐक्य कायम राहिलं. मात्र लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं गेल्या वर्षभरापासून दोघातील अंतर वाढत गेलं. हे पाहून खोत यांनी तुपकर यांची भेट घेऊन पुन्हा मैत्र जागवलं.ऑगस्ट २०२३ मध्ये तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित करताना नाराजीचं दर्शन घडवलं होतं. पुण्यात पक्षाच्या शिस्तपालन समितीमध्ये हा विषय गाजला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी तुपकरांना फटकारलं होतं.त्यावेळी हे पेल्यातील वादळ लवकरच संपेल असं म्हणत राजू शेट्टी यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण या वादळाचं आता फुटीत रूपांतर झालं आहे. रविकांत तुपकरांनी २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात बुलढाण्यात पंधरवड्याची एल्गार यात्रा काढली होती. तेव्हा कुठंही स्वाभिमानीचे बॅनर किंवा राजू शेट्टी यांचा फोटो नव्हता.त्यातून तुपकर यांनी शेट्टी यांच्याशी फारकत घेतल्याचे संकेत मिळाले होते.लोकसभा निवडणुकीवेळी शेट्टी – तुपकर यांच्यातील वाद चिघळत गेला.राजू शेट्टी विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते; तेव्हा तुपकर आंदोलनात होते. त्या आंदोलनात राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याचं आवाहन तुपकर यांनी केलं होतं. पण राजू शेट्टींनी त्याकडे कानाडोळा केला. अशातच शेट्टी यांनी तुपकर यांच्या बरोबरीने स्वाभिमानीत काम करू लागलेले प्रशांत डिक्कर यांना ताकद दिली. त्यातून दुहीची बीजे रोवली गेली. लोकसभा निवडणुकीला रविकांत तुपकरांना स्वाभिमानीने उमेदवारी नाकारली. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढले. हातकणंगलेतून राजू शेट्टी तर बुलढाणा येथून तुपकर यांनी स्वबळावर नशीब आजमावलं पण दोघांनाही पराभूत व्हावं लागलं. दोन वेळा खासदार झालेल्या राजू शेट्टी यांच्या पेक्षा रविकांत तुपकरांना अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे तुपकर यांच्या समर्थकांनी आपली ताकद शेट्टींपेक्षा अधिक असल्याचा दावा समाज माध्यमातून चालवला होता. त्यातून या दोघांतील मतभेद आणखी टोकाला गेले.परिणामी पुण्यात झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांना स्वाभिमानीतून बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचं घोषित केलं. आता राजू शेट्टी हे राज्यात शेतकरी नेते व इतर काही संघटनांना सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. तर रविकांत तुपकर यांनी हकालपट्टीनंतर आपली भूमिका स्पष्ट करून नवीन पक्ष काढत ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ची घोषणा केली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत तुपकरांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा मार्ग आता आणखी काटेरी बनला आहे.