शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. आज पुण्यात पक्षाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. विशेषतः देवेंद्र फडणीवस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती प्रहार केले. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय काय टीका केली पाहुयात.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणावेळी म्हणाले, “बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष “मी ढेकणाला आव्हान देत नाही” ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात आहेत. आणि या तणावात ते जे शब्द वापरत आहे यावर काय बोलावं. अशा व्यक्तीला उत्तर द्यायचं नसतं”. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.