लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपयशाला सामोरे जावे लागले. लोकसभेला जागावाटप उशिरा झाल्याने याचा फटका महायुतीला झाला. आता लोकसभेला बसलेला फटका पुन्हा विधानसभेला बसू नये यासाठी महायुतीने चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीने आत्तापासूनच जागावाटपाबाबत चर्चा सुरु केलीये. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहे. परंतु जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरु झाली आहे. अजित पवार यांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी निफाड तसेच कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
२ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी निफाड तसेच कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना महायुतीतील जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ आपल्या वाटेला येतील. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा, असं त्यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार यांनी कार्यकर्त्याना दिलेल्या आदेशावरून नाशिकमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नाशिक मध्ये निफाड मतदारसंघात अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर भाजपने ठराव केला आहे. या ठरावात त्यांनी निफाड मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, असं म्हंटलंय. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नाशिक मधील भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसने निफाड मतदारसंघातून आपल्याला मदत केली नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपाआधीच महायुतीत वादाची ठिणगी पडायला सुरवात झाली आहे. निफाड विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. राष्टवादी काँग्रेसचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना अजित पवार दिलीप बनकर यांच्या निवासस्थानी देखील गेले होते. त्यानंतर अजित पवारांनी दिवसभर कळवण सुरगाणा मतदार संघाचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.