पुण्यात आज ३ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेवरही भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या ६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दाखवण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोर्टाला विनंती केली आहे.
शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हा निखारा आहे. निखाऱ्याची जबाबदारी सांभाळणं फार कठीण असतं. मशाल अन्याय जाळू शकते, त्यामुळे आपण मशाल चिन्ह निवडलं आहे. येत्या पाच ते दहा किंवा पन्नास वर्षात निकाल नक्की लागेल. तो निकाल लागेल तेव्हा लागेल. पण मी जनतेच्या न्यायालयात आलो आहे. शिवसैनिक वकील आहे. जनता न्यायाधीश आहे. तिथे तुमची बाजू मांडा. जनतेच्या न्यायालयातील सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जनता आपला निकाल देईल असा विश्वास आहे. आम्ही कोर्टाला आता शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही नाद सोडतो”, असे उद्धव ठाकरेंनी पुण्यात झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात म्हटले. लोकशाहीत फक्त शिवसेनेची लढाई नाहीये. उद्या त्यांना अपात्र ठरवलं तरी उद्या ते निवडणूक लढू शकतात. मग आम्हाला कुठे न्याय मिळाला. पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहतो. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारे खूनी आमच्यावर राज्य करत असतील तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा. मी जनतेकडेच न्याय मागणार. गद्दारांनी चोरबाजार मांडला आहे. महाराष्ट्रात लुटालुट सुरू आहे. कंत्राटावर कंत्राट देत आहेत. पैसा उभा करत आहेत. हाच पैसा विरोधक निवडणुकीत वापरणार आहेत. तुम्ही लाडकी बहीण संकल्पना करून लाच देऊन मत मागत आहात. लाज वाटली पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला.