विधानसभेला फक्त काही महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. ८ ऑगस्टला नाशिक मधून या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती दिली. राज्यात पुन्हा रयतेचं राज्य आण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं. ९ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरवात होणार आहे.
मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. पत्रकार परिषदेत खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, रोहित पवार उपस्थित होते. यात्रेच्या पहिल्या टप्यात १० दिवसांमध्ये ७ जिल्हे यात्रा फिरणार आहे. पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली जाईल. ९ ऑगस्ट रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसंच ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन असल्याने ९ ऑगस्ट तारिक निवडली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.