राज्यपाल पदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचं अवैध जात प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढणार असा धमकीवजा इशारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला राज्यपाल पद देऊ असा शब्द दिला होता. मात्र त्यांच्याकडून दिलेल्या शब्दाचं पालन केलं गेलं नाही. भाजपने प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली दाखवली आहे. अशी भावना आनंदराव अडसूळ यांच्या मनात असून त्यांची नाराजी अधिकच वाढत चालली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडसूळ हे एकटेच असे नेते नाहीत की जे नाराज आहेत. त्यांच्यासह इतरही आहेत ज्यांची नाराजी वारंवार समोर येत आहे असे नाराज नेते नेमके कोणते ? आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी नेमकी कशी वाढवली आहे? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ…
शिवसेनेतील बंडाला जून २०२४ मध्ये दोन वर्ष पूर्ण झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड करत ४० समर्थक आमदारांसह वेगळी वाट धरली. न्यायालयीन लढाईत पक्ष आणि चिन्ह मिळवलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरलेले सर्व नेते अनुभवी आहेत. काही ना काही अपेक्षा बाळगून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. मात्र सोबत आलेल्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांची खदखद वारंवार बाहेर आल्याचं पाहायला मिळालं. या दोन वर्षात पक्षातील नेत्यांमधली धुसफूस आणि नाराजी अनेकदा समोर आली. लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. तर तिकीट न मिळाल्यामुळं माजी खासदार आनंदराव अडसूळांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच तिकीट नाकारल्यानं भावना गवळी, कृपाल तुमाने यांचीही पक्षात घालमेल सुरू होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील तोच प्रकार समोर येऊ लागला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना लोकसभा निवडणुकीत तिकिट देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं तेव्हा आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता दोन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. “राज्यपाल पदासाठी वडिलांना शब्द दिला होता. पण राज्यपालांच्या यादीत आमचं नाव का नाही?,” असा सवाल आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित करत पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच पक्ष आणि महायुतीनं आमच्यावर अन्याय केल्याचं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं. “मला राज्यपाल पद न दिल्यामुळं मी नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे सुरू आहेत. मी नाराज आहे हे खरं आहे. महायुती आणि पक्षानं याची दखल घ्यावी,” असं आनंदराव अडसूळ यांनी स्वतःही म्हटलं होतं.. अगदी सुरुवातीलाच जसं सांगितलं की आनंदराव अडसूळ यांनी आता थेट भाजपला इशारा देखील दिला आहे. यातून अप्रत्यक्षपणे त्यांना हेच सांगायचं आहे की दिलेला शब्द पाळा, अन्यथा आमच्याकडे दुसरे पर्याय आहेत. अडसूळ यांच्यामुळे एकनाथ शिंदे हे मात्र मोठ्या कोंडीत सापडले आहेत.