लोकसभेला महायुतीचे केवळ १७ उमेदवार निवडून आले, यामुळे भाजपाने दिलेल्या ४०० पारच्या नाऱ्याला महाराष्ट्रातूनचं ब्रेक लागला. मुंबई म्हणजे ठाकरे असं एक समीकरणचं बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलंय पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याचं ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला भाजप सुरुंग लावणार असल्याचं बोललं जातंय. यासाठी भाजपने विशेष रणनीती आखल्याचं देखील समजतंय.
लोकसभेला मुंबई मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ३ उमेदवार निवडून आले तर मुंबई उत्तरच्या एकाच जागेवर भाजपाला यश मिळाले. यामुळे लोकसभेची कसर भाजपाला विधानसभेला भरून काढायची असल्यामुळे भाजप तयारीला लागला आहे. मुंबई आणि कोकणामध्ये लोकसभेला नाराज झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याना आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी भाजपने आशिष शेलार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे तर कोकणची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांना देण्यात आली आहे. लोकसभेला नाराज असलेल्यांना आपल्या बाजूने करण्याचा आदेश आहेच पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई आणि कोकण साठी काय केलं आणि काय केलं नाही या गोष्टींचा वापर करून ठाकरेंविरोधात मोठं षडयंत्र भाजप आखत आहे. त्याचप्रमाणे महायुतीने मुंबई आणि कोकणसाठी काय काय काम केली ते नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करा असा देखील आदेश देण्यात आला आहे. लोकसभेला नारायण राणेंनी आधीच कोकणातील ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळेल याबाबत शंका नाही परंतु निवडणुकीत कोण कोणाला शह देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.