विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी विधानसभेसाठी इच्छुकांच्या संख्या अधिक असल्यानं चांगलीच रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे. माढा विधानसभा मतदारसंघात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेला माढा मतदारसंघात जसा तिढा पाहायला मिळाला तसाच तिढा विधानसभेला देखील पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत परंतु या मतदारसंघात अनेकजण इच्छुक झाल्यानं राजकारणाचा रंग बदलला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही माढ्यात तिढा का निर्माण झाला आहे?
लोकसभा निवडणुकीवेळी माढा मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. भाजपमधील दोन राजकीय नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते परंतु भाजपने त्यावेळचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत विजय देखील मिळवला. माढा मतदारसंघातून शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळताच शेकापचे अनिकेत देशमुख नाराज झाले. शरद पवार यांनी अनिकेत देशमुख यांची नाराजी दूर करत माढा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी निर्माण झालेला तिढा सोडवला. पण लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील अशा प्रकारचा तिढा पुन्हा एकदा माढा विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे.
आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती परंतु अद्याप तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे महायुतीच्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार माढा विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. पण आता या मतदारसंघातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट आमदारकीची मागणी केली आहे. माढा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेला उमेदवारी द्या किंवा राज्यपाल नियुक्त आमदार करा पण आमदारकी द्या अन्यथा युतीधर्म पाळणार नाही असा इशारा दिला आहे. शिवाजी यांनी स्वतः सुद्धा आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असलायचं त्यांनी घेतलेल्या मेळ्यात स्पष्ट केलं. त्यामुळे आता विधानसभेला देखील माढ्यात तिढा पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभेला अभिजीत पाटील यांनी भाजपला समर्थन दिले होते. परंतु विधानसभेला अभिजीत पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत परंतु माढ्यातील पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात घेतेले तर आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला आहे. त्यामुळे अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे. तसंच माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे १९९५ पासून विधानसभेसभेवर निवडून जात आहेत त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात त्याची ताकद अधिक आहे. त्यामुळे आता शिंदे सावंत आणि पाटील यांच्यातील माढा विधानसभा मतदार संघात तिकिट मिळण्यावरून निर्माण झालेला तिढा महायुती कसा सोडवणार आणि माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.