मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. त्यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा आंदोलकांनी विरोध केला. मराठा आंदोलक धाराशिवमध्ये थेट राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी राडा घातला होता. यानंतर राज ठाकरे बीडमध्ये बैठक ठरलेल्या हॉटेल परिसरात पोहोचले त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांचा ताफा अडवत आंदोलन केलं आणि त्या आंदोलकांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. ते कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे असल्याचा आरोप मनसेनं केला होता. या सर्व घडामोडींमुळं त्यांच्या मराठवाडा दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर त्यांचा विदर्भ दौरा आता सुरु असून त्याचीही चर्चा होत आहे. ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. 26 ऑगस्टपर्यंत त्यांचा विदर्भ दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान चंद्रपुरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण त्यांच्या बैठकीनंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी निघताच सभागृहातच मनसेच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केली. ही हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज ठाकरे यांची चंद्रपुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी सचिन भोयर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. पण त्यांच्या उमेदवारीला पक्षाचेच पदाधिकारी चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. या हाणामारीच्या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत.. या राड्यानंतर मनसे नेते राजू उंबरकर म्हणाले की, “राज ठाकरे यांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यावेळी ते निघाल्यानंतर पक्षाचं नाव खराब करण्यासाठी एका प्रकाश बोरकर नावाच्या कार्यकर्त्याने धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. त्याची पक्षाने आजच हकालपट्टी केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केलं आहे की अशाप्रकारे पक्षात वाद घालणाऱ्यावर कडक कारवाई होईल, असं राजू उंबरकर म्हणालेत. तर मनसेचे जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी म्हटलं आहे की, आपण सर्वात जास्त शाखा उभ्या केल्या. पण राज ठाकरे यांनी आपल्याला विधानसभेचं तिकीट न देता जो 10 ते 12 दिवसांपूर्वी पक्षात आला त्या चंद्रकांत भोयर यांना उमेदवारी जाहीर केली. भोयर हा चंद्रपूरचा रहिवासी आहे, त्याला उमेदवारी देवून राज ठाकरेंनी मोठी चूक केली आहे. राज ठाकरे यांनी राजौरा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द करावी अन्यथा आम्ही बंडखोरी करणार”, असा इशारा बोरकर यांनी दिलाय. राज ठाकरेंनी आदेश दिला की कार्यकर्ते तो आदेश शिरसावंद्य मानून काम करतात. राज ठाकरेंसमोर त्यांच्या पक्षात कोणाची चढ्या आवाजात बोलण्याची हिम्मत होत नाही. मात्र चंद्रपुरात झालेल्या या राड्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला तो मनसैनिकांना मान्य नाही. राज ठाकरेंनी राजुऱ्यातून सचिन भोयर आणि चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र काही मनसैनिकांना त्यांचा हा निर्णय आवडला नाही. मनसैनिकांचा मुख्य आक्षेप हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या राजुऱ्यातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यावरून होता. भोयर हे राजुऱ्यातील नाहीत. ते चंद्रपूरचे आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी मनसैनिकांची होती. पण राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर मनसैनिक भडकले आणि भोयर समर्थक आणि बोरकर समर्थक आपापसात भिडले. राज ठाकरे हा सगळा प्रकार हतबलपणे पाहात होते. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात मराठवाडा दौऱ्यावेळी शिवडीतून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, हिंगोलीतून संतोष कुटे यांची नावं जाहीर केली होती आणि आता विदर्भ दौऱ्यात राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे यांच्या नावाची घोषणा केली. पण मनसैनिकांना राजुरासाठी जाहीर केलेला उमेदवार मान्य नाही. आता राज ठाकरे दोन्ही गटातला वाद कसा शमवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.