विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अवघा एक ते दीड महिना बाकी आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेले, नाराज असलेले, ज्यांना डावलण्यात आलंय, एकनिष्ठतेचं फळ न मिळालेले असे सारेच आता उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी मिळू शकते अशा पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय. यात विशेष बाब म्हणजे भाजपातील अनेक बडे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कोल्हापूरमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला राम राम ठोकला असून त्यांनीही तुतारी हाती घेतली आहे. माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. याच दरम्यान आता नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या दोन तीन दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय? भाजपचे नाराज विवेक कोल्हे तुतारी फुंकणार का ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
नुकतंच पुण्यातील मांजरी इथं पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि बैठकीनंतर कोल्हेंना आवर्जून बोलावून आपल्या गाडीत शेजारी बसवून पुढचा प्रवास केला. विवेक कोल्हे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. तसेच ते भाजपातून बाहेर पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असताना शरद पवारांसोबत एकत्र प्रवास केल्याने या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे. विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपमध्ये आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेकडून उभा असलेल्या आशुतोष काळेंचा २९,२७० मतांनी पराभव केला होता. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा स्नेहलता कोल्हेंनाच उमेदवारी दिली होती. यावेळी देखील त्यांच्याविरोधात आशुतोष काळे उभा होते. मात्र ही निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत अवघ्या ८२२ मतांनी आशुतोष काळेंनी स्नेहलता कोल्हेंचा पराभव केला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळेच हा पराभव झाल्याचा कोल्हेंनी आरोप केला होता. तेव्हापासून विखे आणि कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला. पुत्र विवेक कोल्हेंच्या मनात आईच्या पराभवाची सल कायम आहे.