विधानसभा निवडणूकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेठीगाठी आणि सभा देखील सुरु आहेत. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिल्लीवारी केली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट देखील घेतली. जागावाटप संदर्भात ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत देखील चर्चा झाली. यानंतर आता महाविकास आघाडीमधील जागावाटपाची आकडेवारी सुत्रांच्या माहितीनुसार समोर आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण अशी चर्चा खूप रंगली होती. लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे राज्यात काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तर ठाकरे गटाने देखील त्यांचा मोठा जागांचा दावा केला होता. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार असल्यामुळे ठाकरे गट भाऊ असल्याची मांडणी करत होता. आता मात्र या तिन्ही पक्षातील हेवेदावे मागे राहिले असून निवडणूकांसाठी सामंज्यसाची भूमिका घेतली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी राज्यामध्ये महायुतीला जोरदार प्रत्युत्तर देणार आहे. महाविकास आघाडीकडून प्रचार आणि जागावाटप यांची चर्चा झाली आहे. तसेच विधानसभेसाठी मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेमध्ये मिळवलेल्या यशानंतर आणि देशातील तरुणांचा राहुल गांधींच्या नेतृत्वावरील वाढत्या विश्वासावर काँग्रेस राज्यात देखील बाजी मारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील शरद पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाकडून 95 ते 100 जागांवर लढणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अंतिम जागावाटपात नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.