आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा ही ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीसुद्धा सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत. विधानसभा निवडणूक ही दिवाळी नंतर होण्याची शक्यता आहे. परंतु महायुती सोबतच महाविकास आघाडीचं देखील जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. असं असलं तरी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी काही जागा आपल्यालाच सुटतील असा अंदाज लावायला सुरवात केली आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ आपल्यालाच सुटेल असा अंदाज लावला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते परंतु हि जागा भाजपला सुटली. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटील आणि मनसेच्या किशोर शिंदे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना 1,05,246 मते मिळाली तर मनसेच्या किशोर शिंदे यांना 79,751 मते मिळाली. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा 25,495 मतांनी पराभव केला होता. कोथरूडचे भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छुक असल्याचं दिसत आहे. त्याचप्रमाणे कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या आशयाचे बॅनर्स लावले दिसत आहेत. परंतु भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर हे देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये कोथरूडच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता अधिक आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल असा पक्षाचा अंदाज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये पुणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे हे तीनही नेते आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटला तर या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीतल्या इतर दोन घटक पक्षांकडून फारसं कोणी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत नाही आहे. महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसकडून फक्त एकच इच्छुक उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजत आहे. काँग्रेसचे संदीप मोकाटे हे एकटेच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसकडे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे केवळ एकच अर्ज आल्याचं बोललं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून किशोर कांबळे, संदीप बालवडकर आणि स्वप्निल दुधाने हे तिघेजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजूनतरी हवातसा प्रतिसाद पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे आगमी विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधासभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच लढत पाहायला मिळू शकते.