राज्यात विधानसभा निवडणूक दिवाळी नंतर होणार असली तरी आतापासूनच निवडणुकीचे फटाके वाजू लागलेत… पाच वर्षात बदलेल्या राजकारणामुळे आणि लोकसभेच्या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. महायुती असो की महाविकास आघाडी… दोन्हीकडं इच्छुक उमेदवारांमुळे जागावाटपावेळी मोठा कस लागणार आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांसमोर त्यांच्याच मित्रपक्षांकडून आव्हान उभं राहणार असल्याचं चित्र अनेक मतदारसंघात पाहायला मिळत आहे. असंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा काटोल विधानसभा मतदारसंघ. अनिल देशमुखांना त्यांच्याच मतदारसंघात महाविकास आघाडीमधल्याच मित्रपक्षाकडून आव्हान मिळणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता अनिल देशमुखांना महाविकास आघाडीमधल्या कोणत्या मित्रपक्षाकडून आव्हान उभं राहतंय…? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये अनिल देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. अजुनही अनिल देशमुख कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतातच. आता त्यांच्या काटोल विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचंच आव्हान त्यांच्यासमोर असेल असं चित्र निर्माण झालंय… चर्चेत असलेल्या अनिल देशमुख यांची राजकीय वाटचाल कशी राहिलीय… यावर आपण एक नजर टाकुयात… अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. त्यांनतर १९९५ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांनतर त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. युती सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची मंत्रीपदे भूषवली आहेत. त्यांनतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री म्हणून काम केले. २००१ मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्न व औषध प्रशासन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलं… २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. २००९ च्या आघाडी सरकारमध्ये ते नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री होते. १९९५ पासून २००९ पर्यंत ते सलग ४ वेळा काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अनिल देशमुख यांना २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला. चरणसिंग ठाकूर यांना 79,785 मते मिळाली होती तर अनिल देशमुख यांना 96,842 इतकी मते मिळाली होती. चरणसिंग ठाकूर यांचा त्यांनी 17,057 मतांनी पराभव केला होता. आणि महाराष्ट्रात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री पद सांभाळलं होतं. अनिल देशमुख हे शरद पवारांचे खंदे समर्थक आहेत. विदर्भातील शरद पवारांच्या पक्षाचा ते चेहरा आहेत असं म्हटलं तर, चुकीचं होणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री म्हणून अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारी शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर दिली होती. यावरूनच पवार व देशमुख यांच्यातील जवळीक लक्षात येते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षाने त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला… भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर ईडी व सीबीआय कडून त्यांची चौकशी झाली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. चौंका व कारवायांतून वाचण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडं भाजपात जाण्याचा सोपा मार्ग असतानाही त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं. प्रसंगी ते तुरुंगात गेले. मात्र, भाजपाशी तडजोड केली नाही. आता याच अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा ते इच्छुक आहेत. अशावेळी त्यांच्याविरोधात विरोधकांसोबतच महाविकास आघाडीतीलच काहींकडून आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय.