विधानसभा निवडणुकीची तारीख़ जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी असल्यानं राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभेत महायुतीला धोबीपछाड देण्यासाठी शरद पवारांचे डावपेच सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत पवारांचा सक्सेस रेट सर्वाधिक राहिला. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते शरद पवार यांच्या गोटात सामील होत आहेत. शरद पवारांकडे येणाऱ्यांचा ओढा वाढताना दिसतोय. विरोधकांमधील महत्वाच्या नेत्यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी मोठी रणनीती आखल्याचं दिसतंय. याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शरद पवार यांनी सावंतांच्याच पुतण्याला रिंगणात उतरवण्याचा डाव आखल्याची चर्चा सुरु आहे. सावंतांच्या पुतण्याने पवारांची भेट घेतली असून लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. आता यामुळं महायुतीच्या अडचणी वाढतील का? शरद पवारांनी तानाजी सावंतांना कसं घेरलं? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी आपली ताकद पुन्हा एकदा विरोधकांना दाखवून दिली. लोकसभेला शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक राहिला. त्यामुळं आता विधानसभेला अनेक इच्छुकांना त्यांच्याच पक्षाची तुतारी हाती घ्यायची इच्छा आहे. पण यातून बलाढ्य राजकीय नेत्यांच्या कुटुंबातही फूट पडताना दिसतेय. राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने उघडपणे शरद पवार यांच्या विचारासोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय. अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चेला सुरुवात झाली होती. शरद पवार यांचे विचार आपल्याला पहिल्यापासून भावतात. त्यामुळे आपण शरद पवार यांच्याच पाठीशी राहणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत राहायचे असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत. मात्र, माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचं अनिल सावंत यांनी म्हटलंय. कुटुंब म्हणून आम्ही परिवार एक असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद असल्याने मी या वेळेला पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली असल्याचं त्यांनी म्हटलंय. अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मतदारसंघात त्यांच्याकडून गावभेट दौरे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. अनिल सावंत हे मंगळवेढ्यातल्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. मतदारसंघात गेल्या १०-१५ वर्षांपासून आपला जनसंपर्क असल्याचा दावा ते करतात. आता सावंत हे जरी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असले तरी इथून सावंत यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत.