विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंडखोरीचं प्रमाण जास्त आहे. विधानसभा निवडणुकीत सहा प्रमुख पक्षांसह इतर छोटे मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बंडखोरांचा फटका हा सगळ्याचं पक्षांना बसणार आहे. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात वेगळं चित्र तयार झालं आहे. या मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या मतदारसंघातून भाजपमधून माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाना काटे यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे हे देखील इच्छुक होते. परंतु या मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. आणि नाराज झालेल्या नाना काटेंनी तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेला आणि शरद पवार यांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली गेली. यामुळे नाराज नाना काटे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना याचा फटका बसणार आहे.
नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू नये यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले. थेट अजित पवारांकडून काटे यांना समजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नाना काटे हे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पण पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते अधिक नाराज आहेत. त्यामुळे नाना काटे यांची समजूत काढण्यात अजित पवारांना यश मिळणार का? अजित दादा आणि नाना काटे यांच्या भेटीनंतर नाना काटे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल..
नाना काटे यांनी या आधी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. २०१४ ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढवली होती. यावेळी त्यांचा सामना भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेच्या राहुल कलाटे यांच्यासोबत झाला. या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा 60,297 मतांनी पराभव केला. त्यावेळी लक्ष्मण जगतापांना 1,23,786 मतं मिळाली तर राहुल कलाटेंना 63,489 मतं पडली. तर नाना काटे यांना तिसऱ्या क्रमाकांची 42,553 मतं मिळाली. तर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत झाली. मुख्य लढत ही अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्यातच झाली. या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी नाना काटे यांचा 36,168 मतांनी पराभव केला. अश्विनी जगताप यांना 1,35,603 मतं मिळाली तर नाना काटेंना 99,435 मतं मिळाली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाना काटे अपक्ष निवडणूक लढवणार कि अजित पवार यांच्या भेटीनंतर नाना काटे माघार घेणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.