महायुतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटला मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. मंत्रिपदावर कोणत्या आमदाराची निवड होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ बनल्यानंतर कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार हे देखील महत्वाचं असून विशेषतः पुण्याचा पालकमंत्री कोण होणार यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याच नेत्याला संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्या मागणीला जोर देखील धरला जातोय. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री व्हावेत अशी मागणी लावून धरली जात आहे. मात्र अजित पवार आपला बालेकिल्ला सोडतील असं दिसतं नाही. त्यामुळे पुण्याचे दादा कोण असणार याविषयी आडाखे बांधले जात आहेत. याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर राज्यातील वेगाने वाढणारं शहर म्हणून पुणे शहराची देशभरात ओळख आहे. आयटी हब, सर्व्हिस सेक्टर, शैक्षणिक पंढरी आणि स्थलांतरीतांचं माहेरघर बनत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार की चंद्रकांत पाटील या नावांमध्ये सध्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा केला जात आहे. 2004 पासून अजित पवार हे पुणे शहरासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी सक्रिय आहेत. त्यांना जिल्ह्यातील राजकीय व प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय त्यांची प्रशासनावर चांगली पकड देखील आहे. त्यामुळे अजित पवारांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर भाजप नेतेही पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येतंय. पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व भाजपकडे राहिल्यास कार्यकर्त्यांना आनंद होईल व कामे मार्गी लावण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. परंतु अजित पवार हे स्वतः पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही राहतील. कारण यापूर्वीही त्यांनी आवर्जून पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेऊन घेतलेलं आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत तीनवेळा सरकार स्थापनेच्या प्रसंगांना जनता साक्षी राहिली आहे. सकाळच्या शपथविधीपासून ते ४० आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या मुळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर झालेली घराणेशाहीच्या नेत्यांची परवड जनतेनं पाहिली. शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली होती. मात्र काही काळानंतर अजित पवार सत्तेत आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आणि पुन्हा एकदा अजित पवारांकडे हा कारभार देण्यात आला. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने पुण्यात प्रशासकीय आणि राजकीय वर्चस्व पुन्हा त्यांनी काबीज केलं. त्यांच्याकडून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना कामे आणि टेंडर देण्यात आली असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. याबाबत अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खटके उडाले. त्यामुळे मंत्रीपदाचा विस्तार होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते सतर्क झाले आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करत आहेत. असं असलं तरी अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा सोडतील का हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाचा पेच सोडवण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे.