महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र समोर आलंय. महाविकास आघाडीने २८८ पैकी केवळ ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारं १० टक्क्यांचं संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. शिवसेना ठाकरे गटाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त १० जागा जिंकता आल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजे २९ जागा सभागृहात असण्याची आवश्यकता आहे. परंतु, महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाला त्या मिळवता आल्या नाहीत. आता महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसलं तरी विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. आणि त्यासाठी तिन्ही पक्षांत स्पर्धा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते पदावर नेमकं कोण दावा ठोकून आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी दिल्ली पॅटर्नची चर्चा का होतेय? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय म्हटलं आहे? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदावरून चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या 10 टक्के संख्या आवश्यक असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यामुळं विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे. परंतु यंदाच्या विधानसभेच्या निकालात महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षापैकी एकाही पक्षाकडे इतकं संख्याबळ नसताना काँग्रेस आणि ठाकरे गटात विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधकांकडे संख्याबळ नसलं तरी सुद्धा त्यांचा योग्य तो सन्मान राखत त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अर्थातच सर्वस्वी तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्या कारणानं याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पद आणि उपाध्यक्ष पदाची मागणी केली आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद हे शिवसेना पक्षाकडे असल्यामुळं विधानसभेमध्ये तो अधिकार आमचा आहे. परंतु विरोधी पक्षनेते पदाचा काँग्रेसचा चेहरा कोण असेल हे अद्याप ठरलेलं नसून घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर तो निर्णय केला जाईल असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गट आग्रही आहे. यासाठी पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे.