समाजहितासाठी केलेली सेवा हीच खरी ओळख : विजय भांडारी
पुणे : समाजासाठी निस्वार्थपणे आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान हा केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच एका कार्यसमर्पित आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले लायन किरण शैलेश खंडेलवाल यांचा ‘बेस्ट लायन ऑफ द ईयर’ पुरस्काराने लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.
वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. सामाजिक जाणिवा, नेतृत्वगुण आणि संघभावना यांच्या जोरावर त्यांनी क्लबच्या कार्यपद्धतीत सकारात्मक परिवर्तन घडवले. विविध आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, शिक्षणविषयक उपक्रम आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल विजय भंडारी, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात लायन रश्मी गुप्ता, विकास सराफ, द्वारका जालान, प्रेमचंद बाफना, श्याम खंडेलवाल, भारती भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी प्रांतपाल अध्यक्ष विजय भंडारी म्हणाले की, “समाजासाठी झपाटून काम करणं हीच खरी ओळख असते. लायन किरणजींचं कार्य म्हणजे समाजसेवेची मूर्तिमंत प्रेरणा आहे. त्यांच्या कार्यातून अनेक नवीन कार्यकर्त्यांना दिशा मिळेल आणि समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव निर्माण होईल.”
या पुरस्काराने लायन किरण खंडेलवाल यांना केवळ प्रोत्साहनच मिळालं नाही, तर लायन्स क्लबच्या प्रत्येक सदस्याला अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.