गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट घेतली होती. त्यानंतर आज नारायण राणे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेणार आहेत. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही भेट होईल.
शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या जात आहेत.नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टरविरोधक समजले जातात. आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे-राणे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जून महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे समर्थन नारायण राणे यांनीदेखील केले होते. ‘शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता’ असे ट्वीट राणे यांनी केले होते.
तर, नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले होते. त्यावेळी त्यांनी मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणता. मात्र, तुम्ही एका केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून अटक केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.