शेअर बाजारात दोन दिवस दिसत असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. नफावसुलीने शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेली घसरण बाजार सुरू झाल्यानंतरही कायम राहिली. बँक निफ्टीतही घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारातही एक टक्क्यांची घसरण झाली. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स 215.60 अंकांच्या घसरणीसह 59,504 अंकांवर खुला झाला होता. त्याशिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.90 अंकांच्या घसरणीसह 17,766 अंकावर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 118 अंकांच्या घसरणीसह 59,601.17 अंकांवर व्यवहार करत होता. तर, 48.40 अंकांच्या घसरणीसह 17,767.85 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. नेस्ले, एचयूएल, मारुती, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅब, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण झाली आहे. टीसीएस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेच्या शेअर दरात घसरण झाली आहे. प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स 167 अंकांच्या घसरणीनंतर 59,552 व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 65 अंकांची घसरण दिसून आली. एसजीएक्स निफ्टीदेखील घसरणीसह 17,772 अंकांवर व्यवहार करत होता.