पुणे | ऑनलाईन अर्थात ई-कॉमर्स आल्यापासून दिवसेंदिवस भारतातील छोटे व मध्यम व्यापारी व व्यावसायिकांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: कोरोनानंतर ई-कॉमर्सचे प्रमाण खूप वाढल्याने ई-कॉमर्स च्या स्पर्धेत भारतातील छोटे व मध्यम व्यापारी, व्यावसायिक टिकावेत यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघातर्फे (CAIT) ‘भारत ई मार्ट’ हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर व्यापारी व व्यावसायिकांसाठी नोंदणी सुरु झाली असून ती मोफत असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतात छोटे व मध्यम व्यापाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून परदेशी कंपन्या आपल्या देशात व्यापार करून येथील पैसा बाहेर घेऊन जाऊ लागल्या. तसा इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यापार व त्यातून निर्माण होणारा रोजगार धोक्यात येऊ लागला. ‘भारत ई मार्ट’ मुळे देशातील व्यापाऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठ खुली झाली आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT) व पुणे रिटेल व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत ई मार्ट वर नोंदणीचा कार्यक्रम सुरु केला आहे. या ऑनलाईन पोर्टलवर कोथरूड येथील अंबर हॉल येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नोंदणी करता येईल.
भारत ई मार्टवर नोंदणी केल्यानंतर…
याद्वारे प्रत्येक व्यापाऱ्याचे स्वतंत्र ई दुकान तयार केले जाणार आहे. प्रत्येक दुकानाचा स्वतंत्र QR कोड तयार केला जाईल आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण दुकानाची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. तसेच व्यवसायिकांना बॅंकिंग, कर्ज, विमा सुविधा, वाहतुक सुविधा, कुरियर सेवा, व्यवसाय वाढीचे महत्त्व व उपाय, कायदेशीर सल्ले, व्यवसाय परवाने यांसंबंधीचे संपूर्ण प्रशिक्षण व माहिती पोर्टलवर दिली जाणार आहे आणि या सर्व सुविधा विनामुल्य असणार आहेत. पोर्टलवर केलेल्या व्यवसायावर कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष सुनील गेहलोत, पुणे शहर महिलाध्यक्ष शिल्पा भोसले, अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) पुणे जिल्हा अध्यक्ष विकास मुंदडा, उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, कुमार खत्री आदी मान्यवर उपस्थित होते.