रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे. सतत वाढणाऱ्या महागाई दराला लगाम घालण्यासाठी आरबीआय (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. यूएस फेडरल रिझर्व्हसह जगातील इतर प्रमुख केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केल्यानंतर, आरबीआयनेही रेपो दरात वाढ करणे अपेक्षित आहे. एमपीसीच्या शिफारशींच्या आधारे, आरबीआयने जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती.
याआधी मे महिन्यात मध्यवर्ती बँकेने अचानक झालेल्या बैठकीत व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. दरांबाबतचा निर्णय शुक्रवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँक पुन्हा एकदा मुख्य पॉलिसी रेट रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवून तीन वर्षांचा उच्चांक 5.9 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, जो सध्या 5.4% वर आहे.
आरबीआयने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने एका अहवालात म्हटलं आहे की, फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात दर वाढवल्यानंतर परकीय चलन बाजारातील अलीकडच्या घडामोडी पाहता या वेळी चलनविषयक धोरणावर अधिक बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, आगामी MPC बैठकीत RBI पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करू शकते.
विशेष म्हणजे, सरकारने रिटेल महागाई दर 2 टक्क्यांच्या फरकासह 4 टक्क्यांवर ठेवण्याचे लक्ष्य आरबीआयला दिले आहे. अँड्रोमेडा लोन्सचे कार्यकारी अध्यक्ष व्ही स्वामीनाथन म्हणाले की, इतर अर्थव्यवस्थेतील दर वाढ पाहता आरबीआयकडे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
‘जगभरातील महागाईच्या दबावामुळे अलीकडच्या काळात अनेक देशांनी व्याजदरात सातत्याने वाढ केली आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेशीही जोडला गेला असून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.’ असं अॅसेट अॅडव्हायझरी फर्म अॅनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी यांनी म्हटलं आहे.