भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना सणासुदीच्या काळात ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय, नवीन कर्जेदेखील महाग झाली आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. वर्ष 2023 मध्ये विकास दर हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. याआधी आरबीआयकडून विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मागील पाच महिन्यात व्याज दरात 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी व्याज दर 5.40 टक्के इतका होता. आता, व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे.आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पुढे म्हटले की, मागील अडीच वर्षात जगाला कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाला सामोरे जावे लागले. जागतिक पातळीवर सातत्याने आव्हानात्मक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने त्याचा धैर्याने सामना केला. देशातील ग्रामीण भागात मागणी वाढली असून गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर 6 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.