लातूर | अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला, आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे.
देशमुखांच्या देश अग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागल्याचं दिसून येतंय. अवघ्या काही दिवसात एमआयडीसी भागात या कंपनीला प्लॉट देण्यात आला आहे. त्यासाठी कोट्यवधीचं कर्जही बँकेने उपलब्ध करण्यात आलं आहे.
- कंपनीचं नाव – देश अग्रो प्रा लिमिटेड
- कंपनीची स्थापना किंवा नोंदणी -23 मार्च 2021
- कंपनीचे भागीदार -रितेश विलासराव देशमुख, जिनिलिया रितेश देशमुख (प्रत्येकी 50 टक्के)
- कंपनीचे भाग भांडवल- 7.30 कोटी
- कंपनीची जागा- लातूर एमआयडीसी (सोळा लोकांचा प्राधान्यक्रमाला बाजूला सारत देशमुखांना झुकते माप)
- जागा मागणीचा अर्ज- 05 एप्रिल 2021
- जागेची मंजुरी- 15 एप्रिल 2021 (अवघ्या दहा दिवसात जागा उपलब्ध करून देण्यात आली) प्रत्यक्षात जागेचा ताबा 22/07/2021 रोजी
- पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेत गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला होता. त्यांनंतर त्यांना 27 ऑक्टोबर 2021 रोजी चार कोटीचे कर्ज मंजूर झाले होते.
- 05/10/2021 रोजी लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथे कर्जासाठी अर्ज करण्यात आला. दोन वेगवेगळ्या तारखांना कोट्यवधीची कर्ज मंजूर करण्यात आली.
- 27/10/2021 – 61 कोटी रुपये मंजूर
- 25/07/2022- 55 कोटी रुपये मंजूर