दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारणार
दावोस | दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात कोट्यवधींची परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि संबंधीत कंपन्यांमध्ये करार झाले असून सर्वांत मोठी गुंतवणूक उद्योजक बाळासाहेब दराडे यांच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशन कंपनीने केली आहे. तब्बल २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी करणार असून त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिष्टमंडळ सध्या दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत. त्याठिकाणी महाराष्ट्र सरकारबरोबर अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीच्या संदर्भात करार केले आहेत. त्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
भद्रावती येथे होणाऱ्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचा सामंजस्य करार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे यांच्यामध्ये झाला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे संचालक गोपी लटपटे, निहित अग्रवाल, अजय अग्रवाल, तांत्रिक सहाय्यक जोहान वॅन डायक, आर्थिक सल्लागार जनरल वेस्ली क्लार्क, तांत्रिक सल्लागार डॉ. आर. जी. राजन आदी उपस्थित होते.