मुंबई | शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम दिसून आली. पण बाजार बंद होताना मात्र शेअर बाजार काहीसा सावरल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 59 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 36 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,833 अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये आज 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,558 अंकावर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 1968 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1353 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज Grasim Industries, NTPC, JSW Steel, Adani Ports आणि Titan या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Eicher Motors, Bharti Airtel, IndusInd Bank, Asian Paints आणि HDFC या कपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना कॅपिटल गुड्स, मेटल, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या दोन-तीन सत्रामध्ये शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारामध्ये एकाच वेळी खरेदी तसेच विक्रीही होत असल्याने, तसंच जागतिक परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजार हेलकावे घेत असल्याचं चित्र आहे.