पुणे I अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (CAIT) कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये कॅट महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे आणि चेअरमनपदी हरेंद्र शहा यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच कॅट महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी शंकर ठक्कर आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदी महेश बखाई यांची निवड झाली आहे. ही निवड 2 वर्षांसाठी असणार आहे. कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय, राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना, ‘कॅट महाराष्ट्र’चे नूतन अध्यक्ष सचिन निवंगुणे म्हणाले की, आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम या संघटनेने केले आहे, त्यामुळे व्यापारी संघटनेच्या प्रत्येक सभासदाच्या प्रगतीसाठी व त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या पदाचा पुरेपूर वापर करणार आहे. वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापरासंबंधीचे कायदे व जाचक तरतुदी सोडविण्यासाठी आणि व्यापाऱ्यांसंबंधीच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त काम करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवून जास्तीत जास्त व्यापारी या संघटनेला जोडणार आहे, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.
सिंहगड रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुरू झालेला सचिन निवंगुणे यांचा प्रवास आज कॅट सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचला आहे. या नियुक्तीबद्दल पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून सचिन निवंगुणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एलबीटी आंदोलन, किरकोळ दूध विक्रत्यांना योग्य कमिशन मिळावे म्हणून झालेल्या आंदोलनात सचिन निवंगुणे यांनी चांगले काम केले होते. त्यानंतर पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांसाठी अनेक चांगले उप्रक्रम राबवले. त्यामुळे त्यांना कॅट संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत व्यापारी वर्गासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून कॅट महाराष्ट्र च्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी सचिन निवंगुणे यांना मिळाली.