पिंपरी | शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदखेड गावच्या रस्त्याच्या कडेला खून करुन फेकून दिलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा राग मनात धरुन हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी घडली होती.
समीर शहाबुद्दीन शेख (वय 37 वर्ष), सागर दयानंद पिल्ले (वय 32 वर्ष), सुरज दयानंद पिल्ले (वय 32 वर्ष), रविकुमार अरविंद राठोड (वय 31 वर्ष), नितिन लक्ष्मण पवार (वय 19 ), अजित प्रभूराम ध्रुव (वय 22 वर्ष), हिरालाल उर्फ लाला मंका मोटे (वय 30 वर्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर समाधान तारासिंग पवार (वय 26 वर्ष ) खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांनी फिर्याद दिली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडखेड गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला गवतामध्ये एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलीस ठाण्याचे तपास पथक गुन्हे प्रकटीकरण पथक आणि पिंपरी चिंचवड चे गुन्हे शाखा पथक करीत होते. मृतदेहाच्या पाहणी दरम्यान काही संशयास्पद गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. मृताच्या डाव्या डोळ्याच्या खाली अवजड वस्तुने प्रहार केले असल्याचे दिसून आले होते. हा खुनाचा प्रकार असल्याने शिरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाय मृताच्या उजव्या हातावर समाधान व डाव्या हातावर जमुना व उजव्या हाताच्या दोन नंबरच्या बोटावर शितल असे नाव गोंदवलेले होते. कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने आरोपींना शोधणे पोलीसांसमोर आव्हान होते. मृताची ओळख पटावी या करिता पोलीसांकडून मृतदेहाचे वर्णन सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना खुन झालेल्या व्यक्तीची ओळख पटली. तो अकोला जिल्ह्यातील महागाव ( मारखेड ) येथील असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. शिरगाव पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठ्या शिताफिने चिंचवडच्या विद्यानगर परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन 3 आरोपींना शिरगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता मयत समाधान आणि त्याच्या इतर साथीदारांनी पूर्वी स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. हा राग मनात धरुन त्याचा काटा काढण्यासाठी आम्ही त्याचा खून केला असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने या गुन्ह्यातील इतर 3 आरोपींना बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. सर्व अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. पुढील तपास सुरु आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, उप-निरीक्षक संतोष येडे, सहायक फौजदार नंदकुमार चव्हाण, हवालदार तुकाराम सावळे, प्रशांत भोसले, सुधीर वाडिले, नाईक समिर घाडगे, योगेश नागरगोजे, कॉन्स्टेबल समाधान फडतरे, गुन्हे शाखा युनिट- 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे, उप निरीक्षक राहुल कोळी, सहायक फौजदार किरनाळे, हवालदार बनसोडे, बहिरट, ठाकरे, नाईक मालुसरे, शेख, कॉन्स्टेबल ईधारे, खेडकर, गाडेकर, गुट्टे, तसेच तांत्रिक विभागाचे उप निरीक्षक रमेश पवार, हवालदार माळी, नाईक पंडित, कॉन्स्टेबल हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.