पुणे | वाकड येथे गांजा विक्री करणाऱ्या तडीपार भावाला सोडवण्यासाठी चक्क पोलिसांवर कुत्रं सोडण्यात आलं. कुत्र्याच्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अवैद्यरित्या गांजा तस्करी आणि पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भावाला सोडवण्यासाठी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडण्याची मजल काहींनी गाठली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांना एका खबऱ्याकडून वाकड परिसरातील म्हातोबा नगरात काही लोक गांजाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी केली.
त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना चौकशीदरम्यान आपले नाव रवींद्र घाडगे असल्याचे सांगितले. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता त्याला गेल्या 2 महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांनी रवींद्रच्या हातात असलेली प्लॅस्टिकची कॅरीबॅगची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. त्याला लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले.
रवींद्र याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्याचा भाऊ सागर घाडगे याला समजताच तो त्याचा मित्र अशोक तुपेरे आणि पाळीव कुत्र्यासह तिथे दाखल झाला आणि पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सागरने पोलिसांवर सोबत आणलेला कुत्रा सोडला. कुत्र्याच्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अशोक आणि सागर यांनी तिथून धूम ठोकली. राजेंद्र मात्र पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही.
कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्लास्टिकच्या कॅरीबॅगमधून जप्त केलेल्या 20,250 रुपये किमतीच्या 810 ग्रॅम गांजासह पोलिसांनी रवींद्रला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच पोलीस फरार सागर आणि अशोकचा शोध घेत आहेत.