पुणे | पुणे पोलिसांना सूरत येथून गुन्हेगाराला पकडण्यात यश आले आहे. पुण्यात बनावट तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याचे खोटे आश्वासन देणारी वित्तीय संस्था चालवली जात होती. तत्काळ कर्जाचे आमिष दाखवून 100 ते 150 जणांना या बंटी-बबलीच्या जोडीने फसवले होते. मात्र लोकांना गंडा घालणाऱ्या या जोडीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिपाली जितेंद्र पौनिकर (वय 32), हेमराज जीवनलाल भावसार (वय 28) दोघे राहायला सार्थक सोसायटी, सूरत, गुजरात अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडे
चित्रपट निर्मितीसाठी पैसे नसल्याने पुण्यात बनावट वित्तीय संस्था सुरु केली होती. या जोडप्याला स्वारगेट पोलिसांनी गुजरात मधील सूरत येथून अटक केली आहे. आरोपींनी कर्ज मंजुरीच्या आमिषाने 12 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
दिपाली आणि हेमराज हे दोघे एकत्र राहत असून त्यांना डान्सची आवड आहे. त्यांनी त्यांच्या नृत्याची क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित करुन लोकप्रियता मिळवली होती. दोघांना चित्रपटात काम करायचे होते. मात्र पैसे नसल्याने ते पुण्यात आले. पुण्यातील स्वारगेट भागातील मुकुंदनगर भागातील एका इमारतीत त्यांनी मानधन मायक्रो फायनान्स नावाची वित्तीय संस्था सुरु केली. गुलटेकडी परिसरातील कामगार लोकांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले. पैसे घेऊन कर्ज न देता या दोघांनी ऑफिस बंद करुन पळून गेले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव उपनिरीक्षक अशोक येवले, फिरोज शेख, शिवदत्त गायकवाड, घुले, गोंडसे, होळकर यांनी तपास सुरू केला.. दिपाली आणि हेमराज सूरतमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना सूरतमधून अटक केली.