सीबीआय अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि लाच मागणाऱ्या चार जणांना मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. एका खासगी कंपनीत जाऊन पाच लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन तिघांना अटक केली तर तिथून पळ काढलेल्या एका आरोपीला पाठलाग करुन ताब्यात घेतलं. या टोळीतील पाच जण अजूनही बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बिझनेससाठी कर्ज घेणाऱ्यांना ही टोळी फसवत असे. ही टोळी सुरुवातीला लोकांना कर्ज देण्याचं वचन द्यायची. नंतर कर्ज मंजूर करण्याच्या नावावर रोख रकमेची मागणी करायची. संबंधित व्यक्ती कॅश देण्यासाठी तयार झाल्यानंतर रोख रक्कम दिल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकवू असं म्हणत ही गँग त्यांच्याकडून लाच मागत असे.
गोरेगाव पोलिसांना 30 सप्टेंबर रोजी माहिती मिळाली होती की, गोरेगावच्या उन्नतनगर परिसरात आस्तिक ट्रेडिंग प्रायव्हेट कंपनीत चार जण घुसले असून सीबीआय आणि पोलिसाचं ओळखपत्र दाखवून पाच लाख रुपयांची मागणी करत आहेत. यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय थोपटे यांच्या मार्गदर्शनासाठी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तीन जणांना ताब्यात घेतलं. तर एकाला तिथून पळ काढण्यात यश आलं. या तिघांकडे सीबीआय आणि पोलिसाचे बनावट ओळखपत्रे सापडले. हे सगळे बोगस सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.