अफगाणिस्तानातील बॉम्ब स्फोटांचं सत्र सुरुच आहे. मशिदींमध्ये नमाज पठण करणाऱ्या लोकांवर हल्ले देखील सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं बॉम्ब स्फोट करण्यात येत आहेत. काबूलमधील एका मशिदीत नमाज पठण करणाऱ्या २० लोकांचा बॉम्ब स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत ४० लोक झकमी झाले आहेत. बुधवारी सांयकाळी काबूलमधील एका मशिदीत झालेल्या स्फोटात २० लोक मारले गेले आहेत. बॉम्बस्फोटाची तीव्रता मोठी असल्यानं त्याचा आवाज दूर अंतरापर्यंत पोहोचल्याची माहिती काबूलमधील प्रशासनानं दिली आहे. तालिबाननं सुरुवातीला बॉम्ब स्फोटातील मृतांची संख्या लपवण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर स्फोटात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
काबूलच्या इमरनजन्सी रुग्णालयानं २७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामध्ये पाच मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. तालिबानच्या सुरक्षारक्षकांनी परिसर सील केला आहे. काबूल स्फोटातील रुग्नांना विविध रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. काबूल शहरातील सर-ए-कोटल खैरखाना भागातील मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. काबूल सुरक्षा विभागाच्या खालिद जरदाननं या घटनेला दुजोरा दिला आहे.
काबूलमधील बॉम्बस्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. सातत्यानं मशिदींना लक्ष्य केलं जात आहे. आतापर्यंत शिया मुस्लीम समाजाच्या मशिदींना लक्ष्य केलं जात होतं. मात्र, यावेळी ज्या मशिदीच्या परिसरात बॉम्बस्फोट झाला आहे तिथं शिया मुस्लिमांची संख्या कमी आहे.
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान सरकार आहे. तालिबानच्या सरकारचं एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉम्बस्फोटांच्या घटना ववाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मशिदीत स्फोट झाला होता. त्यावेळी ८ जणांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानमध्ये गुरुद्वारामध्ये देखील स्फोट करण्यात आला होता. घटनास्थळी स्थानिक सुरक्षा दलांनी शोधकार्य सुरु केलं आहे. काबूलमधील स्फोटात संबंधित मशिदीच्या इमामाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. सीरिया आणि इराकमधील अतिरेकी अफगाणिस्तानमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.