महाराष्ट्रातील गुंतवणूक, उद्योगधंदे गुजरातला आंदण दिले जात असल्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून सुरू होता. यासाठी अनेक दाखले दिले जातात. आता आणखी एका प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मितीचा उद्योग गुजरातमध्ये गेला. यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीसोबत तीनवेळा बैठका झाल्या होत्या. जवळपास सर्व मुद्यांवर सहमती झाली असल्याचे म्हटले जाते. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिकाऱ्यांची जुलै महिन्यात अंतिम बैठक झाली होती. मात्र, हा उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये सुरू होणार आहे.
सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार, सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती. वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती.
या उद्योगामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली असती. डिझाइन्स नाविन्यपूर्णतेमध्ये जागतिक संशोधन आणि विकासामध्ये महाराष्ट्राची ओळख झाली असती. प्रकल्प होणार असलेल्या पुण्याच्या तळेगावमध्ये विशेषतः महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगारक्षम करता आला असते. त्याशिवाय, महाराष्ट्राची ओळख ही दुसरी सिलिकॉन व्हॅली झाली असती. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होऊन 150 हून अधिक कंपन्या गुंतवणुकीचा भाग झाल्या असत्या. स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगालाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं असते.
भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ 2020 मध्ये 15 अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.