दिल्ली | उझबेकिस्तानातील समरकंद येथे एसओएस समिट सुरु आहे. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये मोदींनी आपली भूमिका मांडली
आजचा काळ युद्धाचा नाही, येणाऱ्या काळात शांततेच्या मर्गावर आपल्याला पुढे जावं लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, “मला रशिया आणि युक्रेनचे आभार मानायचे आहेत. कारण युद्धाच्या संकटकाळात सुरुवातीला आमचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. तुम्हा दोन्ही देशांमुळं त्यांना सुखरुप भारतात आणण्यात यश आलं. मला जाणीव आहे की आजचा काळ हा युद्धाचा नाही. यापूर्वीही फोनवरुन मी तुमच्यासोबत अनेकदा लोकशाही, रणनीती तसेच संवाद यावर चर्चा केली आहे. या सर्व गोष्टी जगाला स्पर्शून जातात. त्यामुळं येणाऱ्या काळात शांततेच्या मार्गावरुन आपण कसे पुढे जाऊ यावर आपण चर्चा करूया . याबाबतचा आपला काय दृष्टीकोन आहे हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे”
दरम्यान, भारत आणि रशियाचे संबंध अनेक पटीनं वाढले आहेत. आपण कायमच असे मित्र राहिलो आहोत जे गेल्या अनेक देशकांपासून एकमेकांसोबत आहेत. व्यक्तीगत स्वरुपात सांगतो की आपल्या दोघांचा प्रवास एकत्रच सुरु झाला. आजची आपली भेट आणि चर्चा ही येणाऱ्या काळातील आपले संबंध अधिक गहिरे करतील आणि जगातील समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरेल अशी मला आशा वाटते, अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल आभार व्यक्त केले.डिसेंबरमध्ये तुम्ही भारतात आला होतात तेव्हा अनेक विषयांवर आपली चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा आपली भेट होत आहे. जगासमोर विशेषतः विकसीत देशांसमोर आज सर्वात मोठी चिंता आहे ती अन्न, तेल आणि खतांच्या संरक्षणाची. आपल्याला यामध्ये जरुर मार्ग काढावे लागतील तुम्हालाही यासाठी उपाय शोधावे लागतील, असंही मोदी यावेळी म्हणाले.