नवी दिल्ली | आम आदमी पक्षाची सत्ता आल्यापासून दिल्लीच्या राजकारणात नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप समोर आले आहेत. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना (Vinai Kumar Saxena) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘नायब राज्यपाल साहेब रोज मला इतके ओरडतात की तेवढं माझी बायकोही ओरडत नाही’. तसेच सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जी छापेमारीची कारवाई सुरु आहे त्यावरूनही त्यांनी टीका केली.
दिल्ली हे केंद्रशासित राज्य असल्याने या राज्याचा बहुतांश कारभार केंद्रीय पातळीवर चालतो. तसेच या राज्यात ‘आप’ची सत्ता आल्याने केजरीवाल विरूद्ध नायब राज्यपाल हा वाद नेहमीच पाहिला मिळतो. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करत पुन्हा एकदा नायब राज्यपालांवर टीका केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘नायब राज्यपाल रोज मला इतके ओरडतात. इतकं तर मला माझी बायकोही ओरडत नाही. गेल्या सहा महिन्यात नायब राज्यपालांनी मला इतके ‘लव्ह लेटर’ पाठवले इतके तर माझ्या बायकोनेही मला पाठवले नाही. तसेच साहेब, थोडं थंड घ्या आणि तुमच्या सुपरबॉसलाही थंड घ्यायला सांगा’, अशा शब्दांत त्यांनी मोदींनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
दरम्यान, केजरीवाल यांना अडचणीत आणण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहे. त्यात दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून यापूर्वी अनिल बैजल असो की विद्यमान नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनीही केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. त्यानंतर आता केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.
ईडीच्या कारवाईवरूनही टीकास्त्र
ईडीच्या कारवाईवरून केजरीवाल यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की 3 महिन्यांपासून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी 24 तास काम करत आहेत. अशाने देशाची प्रगती कशी होणार? दरम्यान, शुक्रवारी पंजाब आणि दिल्लीत डझनहून अधिक ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्यावरून केजरीवालांनी टीका केली.